गुरुपौर्णिमा

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्हाला हे गाणं शाळेत असताना संगीताच्या तासाला बाई शिकवायच्या. नुकत्याच वर्तमान पत्रातून दोन बातम्या ठळकपणे फिरत होत्या. पहिली दहावीच्या 95%विद्यार्थ्यांना सरसकट पास केल्याची बातमी आणि दुसरी करोनामुळे दहावीची परीक्षाच रद्द केल्याची बातमी. मनात म्हटलं ‘चंगळ आहे आता या पोरांची’ परीक्षा रद्द झाल्यात. जवळपास सगळेच पास झाले आहेत. पण मग मनात विचार आला की करोना नंतरच्या काळात हे विद्यार्थी शिक्षणाचा हा वसा पुढे कसा नेणार?

 

मी जर आताच्या काळात विद्यार्थी असतो तर परीक्षा रद्द झालीय म्हणल्यावर पहिल्या एक दोन वेळा मला आनंद झाला असता. पण जर वारंवार असं व्हायला लागलं तर अभ्यासातला सिरीयसनेस निघून जाईल. परिणामी गुरूजनांबद्दल आदर कमी होईल. घरातूनच सगळं करायचंय ना मग कसंही वागलं तरी चालेल.. असा अॅटिटयुड होत चाललाय. आजकाल.म्हणजे एकीकडे लॅपटॉपवर ऑनलाइन शिक्षण घ्यायचं आणि दुसरीकडे झोपा काढायच्या, माकडचाळे करायचे. मग अशाने शिक्षकांचा धाक राहणार नाही. आता तुम्ही म्हणाल लॅपटॉपचा कॅमेरा शिकताना आणि शिकवताना सुरू असतो. पण आजची तरुण पिढी असल्या बाबतीत किती हुशार आहे ते सांगायला नकोच.

दुसरं महत्वाचं म्हणजे करोनानंतर शाळेत जाणारी विद्यार्थीपिढी शाळेतलं वातावरण,शिक्षकांचा ओरडा, सकाळी लवकर उठून शाळेची तयारी करणं, सुट्टीतला अभ्यास, ती धावपळ हे सगळं आम्ही जे अनुभवलं ते मिस करणार आहे. हे सगळं जर असंच सुरू राहिलं तर ही नवी पिढी लॅपटॉपलाच गुरू मानून गुरुपौर्णिमेच्या दिवशी लॅपटॉपलाच हार वैगरे घालताना पुढच्या दहा वर्षात दिसली तर नवल वाटायला नको..

Related posts

Leave a Comment