मेजर ध्यानचंद म्हणजे आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रात असलेले गोल नोंदविण्याचे मशीनच आहे हे उद्गार सामान्य हॉकीपटूचे नसून क्रिकेट क्षेत्रातील अजरामर व्यक्तिमत्व सर डॉन ब्रॅडमन यांचे आहेत. त्यांच्या या शब्दातच जागतिक स्तरावर हॉकीचे जादूगार म्हणून बीरूद लाभलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय कौशल्याचा प्रत्यय येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १८५ सामन्यांमध्ये ५७० गोल करणे ही त्यांची खरोखरीच अद्वितीय कामगिरी आहे. त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावरच भारताने हॉकीत सुवर्णयुग निर्माण केले होते. आपल्या देशात क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अलीकडेच हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून देण्यात येईल अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली आहे.
या घोषणे मागील राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून जर आपण ध्यानचंद आणि भारतीय हॉकी क्षेत्र याचा विचार केल्यास त्यांच्या नावाचा पुरस्कार म्हणजेच आपल्या हॉकी क्षेत्राचा खऱ्या अर्थाने गौरव केला गेला आहे असेच म्हणावे लागेल. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ मानला जातो दुर्दैवाने १९८० मध्ये झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकानंतर गेली ४१ वर्षे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाची पाटी कोरीच राहिली होती. टोकियो येथे नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने ऐतिहासिक ब्राँझपदक तर महिला संघाने चौथे स्थान मिळवीत पुन्हा एकदा भारतीय हॉकी क्षेत्रास नवसंजीवनी दिली आहे.
सन १९२८ ते १९८० या काळात भारतीय पुरुष संघाने आठ सुवर्णपदके, एक रौप्य आणि दोन ब्राॅंझ अशी कमाई करीत आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र नंतर वेगवेगळ्या कारणास्तव भारतीय हॉकी क्षेत्राची शान रसातळाला गेली होती. किंबहुना भारतामधील हॉकी संपुष्टात आली की काय अशी शंका निर्माण झाली होती. तथापि गेल्या सात आठ वर्षांमध्ये भारतामध्ये निर्माण झालेल्या जागतिक कीर्तीच्या सुविधा, ओडिशा शासनाचे बहुमोल सहकार्य, खेळाडूंची देशासाठी असलेली निष्ठा आणि आत्मविश्वास, प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन आणि हॉकी संघटनांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळेच पुन्हा एकदा भारतामध्ये हॉकीचे सुवर्णयुग नांदू शकेल असेच वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांचे प्रेरणास्थान मेजर ध्यानचंद आणि त्यांच्या समवेत खेळलेले अनेक रथी-महारथी खेळाडू हेच आहेत.
आपण कधी हॉकी क्षेत्रात करियर करू असे ध्यानचंद
यांच्या ध्यानीमनी नव्हते. ध्यानचंद यांचे वडील लष्करात होते त्यामुळे ध्यानचंद यांनीही सैन्यदलात रुजू होण्याचा निर्णय घेतला. सैन्यदलात आल्यानंतर त्यांना हॉकी क्षेत्रानेच ओढून घेतले. सैन्यदलाचा संघ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असे आणि अशा स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांच्या स्टिकची जादू इतरांना लक्षात येऊ लागली. १९२६ पासून त्यांच्या स्पर्धात्मक हॉकी कारकिर्दीस खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. ब्रिटिश इंडिया संघाकडून खेळताना त्यांनी आपल्या संघाला अनेक विजेतेपद मिळवून दिली. १९२८, १९३२ आणि १९३६ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतास सुवर्णपदक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. १९३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी कर्णधारपदाची धुरा अतिशय मोठ्या हिकमतीने पेलली होती. दुसऱ्या महायुद्धामुळे दोन ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत अन्यथा त्यांनीआंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक हजार गोलांचा अनोखा विक्रमही केला असता.
स्टिकमधील जादू
एकदा का स्टिकमध्ये चेंडू आला की तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्ट मध्येच जाणार अशी ध्यानचंद यांची ख्याती होती. त्यांचे ड्रिबलिंगमधील कौशल्य आणि चेंडूवरील नियंत्रण अफलातून होते. अर्थात इतरांना योग्य वेळी पास देत संघाचा गोल कसा होईल हे देखील ते चाणाक्षपणे पहात असत. हॉकी हा सांघिक समन्वयाचा खेळ आहे हे तत्व डोळ्यासमोर ठेवीत ते खेळत असत. जर आपण चेंडू घेऊन जात असताना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आपल्याला अडवणार आहेत हे लक्षात आल्यानंतर ते निमिषार्धात आपल्या सहकाऱ्यांकडे पास देत असत. पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांनी दिलेला पास ते स्वतः रोखायचे आणि तो चेंडू थेट गोलातच मारायचे. आत्ताच्या हॉकी मध्ये पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल मारण्यासाठी दोन जणांची मदत घ्यावी लागते. ध्यानचंद यांच्या स्टिकमध्ये एखादा धातू वगैरे आहे की काय अशी शंका येऊन हॉलंडमधील स्पर्धेच्या वेळी त्यांची स्टिक तोडण्यात आली होती. अमेरिकन दोन तीन खेळाडूंनी यांच्याकडील स्टिक घेऊन त्याबदल्यात स्वतःकडच्या स्टिक त्यांच्याकडे दिल्या होत्या. पण स्टिक कुठली का असेना मी माझे काम शंभर टक्के कौशल्याने पूर्ण करणार अशी खुबी त्यांच्यात होती. १९४७ मध्ये भारत आणि ईस्ट आफ्रिकेचा दौरा केला होता त्यावेळी ४३ वर्षांच्या ध्यानचंद यांनी २२ सामन्यांमध्ये ६१ गोल करीत आपण अजूनही हॉकीसाठी १००% तंदुरुस्त आहोत याची झलक दिली होती.
हिटलर यांच्याकडून कौतुक
बर्लिन येथे १९३६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताने अजिंक्यपद मिळवताना सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली होती. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जर्मनीचे सर्वेसर्वा असलेले ॲडाॅल्फ हिटलर यांना सर्व संघांमधील खेळाडूंनी सॅल्यूट ठोकावा असा अलिखित नियम करण्यात आला होता. मात्र ध्यानचंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पष्टपणे नकार दिला. या स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताला जर्मनीने सहज हरविले होते. या सामन्यातील झालेल्या चुका दुरुस्त करीत प्रत्यक्ष स्पर्धेत भारताने सातत्यपूर्ण कामगिरी केली. अंतिम सामन्यात जर्मनीविरुद्ध पूर्वार्धात भारताकडे १-० अशी आघाडी होती. मध्यंतरापर्यंत जर्मनीच्या खेळाडूंनी खूपच दांडगाईचा खेळ केला होता. ध्यानचंद यांचा एक दातही या दांडगाईमुळे तुटला. उत्तरार्धात त्यांनी केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने आणखी सात गोल नोंदविले. जर्मनीला स्वतःच्या घरच्या मैदानावर फक्त एकच गोल नोंदविता आला होता. संपूर्ण स्पर्धेत भारताने स्वीकारलेला हा एकमेव गोल होता. सामन्यातील भारताचे पारडे जड झाल्यानंतर हिटलर सामना सोडून निघून गेले. नंतर बक्षीस वितरणाच्या वेळी ते पुन्हा आले. त्यांनी सुवर्णपदक देताना ध्यानचंद यांना जर्मनीच्या सैन्यदलात मोठ्या पदावर काम करण्याचे आमंत्रण दिले, मात्र ध्यानचंद यांनी ते स्पष्टपणे धुडकावून लावले होते.
हॉकी हाच श्वास
ध्यानचंद यांचे कुटुंबच हॉकीसाठी वाहिलेले होते. त्यांचे बंधू रूप सिंग यांनीदेखील ऑलिंपिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. या बंधूंची पुढची पिढी भारताच्या हॉकी क्षेत्रात नेहमीच आघाडीवर होती. स्पर्धात्मक हॉकीतून निवृत्त झाल्यानंतर या खेळाचे ऋण म्हणून त्यांनी सुरुवातीला राजस्थानमधील हॉकी अकादमीमधून अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. नंतर त्यांनी पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत मुख्य हॉकी प्रशिक्षक म्हणूनही यशस्वीपणे जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला अनेक आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मिळाले आहेत.
ध्यानचंद आणि रूप सिंग हे बंधू हॉकी खेळत असताना भारताने जागतिक स्तरावर निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. हॉकीच्या सुवर्णयुगात भारताविरुद्ध खेळताना परदेशी खेळाडूंना धडकी भरत असे. अजूनही अनेक परदेशी प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना ध्यानचंद यांच्याच कौशल्याचा पाठपुरावा करीत असतात. त्यावेळी भारतीय संघ ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. हॉकी हा सांघिक समन्वयाचा आणि एकदिलाने कौशल्य दाखवण्याचा खेळ मानला जातो. या खेळाद्वारे युवा पिढीमध्ये देशप्रेम आणि एकजूट निर्माण करण्याचे मोठे कार्य तत्कालीन भारतीय हॉकीपटूंनी केले. ध्यानचंद यांच्या अलौकिक कामगिरीपासून स्फूर्ती घेत भारताने हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ निवडला.
टोकियो येथे नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपणाचा आनंद आपल्या देशातील कोट्यावधी लोकांनी घेतला. अटीतटीने झालेल्या सामन्यानंतर भारतीय पुरुष संघाने ब्राँझपदक जिंकल्यानंतर लाखो चाहत्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले तसेच महिलांचे ब्राँझपदक हुकल्यानंतर अनेकांना दुःख झाले पण ज्याप्रकारे आपल्या महिला खेळाडू तेथे लढल्या त्याबद्दल सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटला आहे. या दोन्ही संघांनी भारताच्या हॉकीची प्रतिमा आणखीनच उंचावली आहे. त्यांच्या या कामगिरीचा यथोचित सन्मान व्हावा या दृष्टीनेच क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराला ध्यानचंद यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला असावा. या पुरस्काराने भारतीय हॉकी क्षेत्राचा खऱ्या अर्थाने योग्य गौरव झाला आहे. क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी देशाच्या सर्वोच्च क्रीडापटूच्या नावाची ज्या देशात निवड होते त्या देशातील भावी क्रीडापटू नक्कीच भाग्यवान असतील आणि हे क्रीडापटू देशाची मान उंचावतील असे छातीठोकपणे म्हणता येईल.
– मिलिंद ढमढेरे