“भारती” संस्कृत पत्रिकेचे संस्थापक : दादाभाई

आज सगळीकडे इंग्रजाळलेलं वातावरण आहे. संस्कृत भाषा म्हणजे साक्षात देवांची भाषा असं जिला एकेकाळी संबोधलं जात असे तिला आता मृतावस्था आल्यागत झालं आहे. अशातच श्री गिरीराज शास्त्री (दादा भाई) यांनी संस्कृतची मासिक पत्रिका ‘भारती’च योग्य प्रकारे व्यवस्थापन करून,सुरू ठेऊन लोकांना एक नवा मार्ग,पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दादा भाई यांचा जन्म 9 सप्टेंबर 1919 (अनंत चतुर्दशी) ला राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्य़ातील कामा नगर मधे आचार्य आनंदीलाल आणि श्रीमती चंद्राबाई यांच्या घरात झाला होता. यांचे पुर्वज राजवैदय होते. सहावीनंतर दादा भाईंनी संस्कृतची प्रवेश परीक्षा,उपाध्याय तसेच शास्त्री या पदव्या घेतल्या. यजुर्वेद अध्ययनात विशेष प्रावीण्य मिळवत त्यांनी इंटरमिजीएट परीक्षा दिली. आणि उत्तमरित्या उत्तीर्ण झाले. स्वस्थ व सुडौल शरीर असल्याने लोक त्यांना ‘पहिलवान’ म्हणत. 13 वर्षांचे असताना त्यांचे लग्न झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते जयपूरच्या रथखाना विद्यालयात संस्कृत शिकवायला लागले. 1942 मधे जयपूर मध्येच स्वयंसेवक झाले. 

व्यायामाची आवड असलेल्या दादाभाईंना शाखेतले खेळ सुर्यनमस्कार इत्यादी आवडायला लागले. आणि ते संघातच रमले. यानंतर त्यांनी अनुक्रमे 1943,44 तसेच 1945 या वर्षांत संघ शिक्षा वर्गामधे प्रशिक्षण घेतले. स्वातंत्र्यपूर्व काळात जयपूर मधे संघावर बंदी होती. म्हणून शाखा कीर्तनाच्या नावाखाली भरत असे. प्रांत प्रचारक श्री बच्छराज व्यासांनी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रमुख कार्यकर्त्यांना काही टोपण नावे दिली. त्यावेळपासून त्यांचं हेच नाव सगळीकडे प्रचलित झाले. तृतीय वर्ष केल्यावर दादाभाई जयपूर नगर कार्यवाह , नगर प्रचारक तसेच सीकर आणि झुंझनु मध्ये जिल्हा प्रचारक होते. बंदीकाळामधे नोकरी गेल्याने सरकार्यवाह एकनाथ रानडे यांनी संघ कार्यालयात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. बाबासाहेब आपटे यांच्या सांगण्यावरून दादाभाईंनी संपादित केलेली ‘भारती’ ही संस्कृत पत्रिका 1990 च्या दिवाळी मध्ये प्रथम सुरू करण्यात आली. 1953 ते 1992 पर्यंत दादाभाई राजस्थानचे प्रांत कार्यवाह होते. याच दरम्यान झालेल्या श्री गुरूजींच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त धनराशी जमा करण्यात, गोरक्षेसाठी सह्या गोळा करणे,स्वामी विवेकानंद तसेच श्री अरविंद यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात तसेच रामजन्म भूमी आंदोलनात दादाभाईंचा सक्रिय सहभाग होता.

1975 च्या प्रतीबंध काळात दादाभाई वेष बदलून संपूर्ण प्रांतात फिरत असत. पोलिसांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना पकडू शकले नाहीत. 1990 मधे कारसेवेसाठी अयोध्येला जात असताना त्यांना मथुरेच्या नरहोली ठाण्यात 15 दिवसांकरता बंदी म्हणून ठेवले गेले. 1992 मधे त्यांच्या तब्येतीची स्थिती पाहून त्यांना अनुक्रमे प्रांत संपर्क प्रमुख, क्षेत्र प्रचार प्रमुख क्षेत्रीय कार्यकारणीचा सदस्य म्हणून काम देण्यात आले. 1997 ते 2006 पर्यंत ते ‘पाथेय कण’ संस्थेचे अध्यक्ष होते. या सगळ्या गदारोळात त्यांचे भारती पत्रिकेच्या कामाकडे पूर्ण लक्ष असायचे. 2009 मधे त्यांची नव्वदी साजरी करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत,उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत डाॅ. मुरली मनोहर जोशी असे मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मात्र दादाभाईंची तब्येत खूप खालावली. आणि अखेर 13 मार्च 2012 ला त्यांचे निधन झाले. दादाभाई हयात असताना त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. म्हणूनच त्यांचा देह उपयोगात आणण्यासाठी चिकित्सा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला गेला.

Related posts

Leave a Comment